स्पिती व्हॅली
व्हर्चुअल टूर: 1 - स्पिती व्हॅली
साधारण शंभर वर्षांपूर्वी रुडयार्ड किपिलग या लेखकाने त्याच्या "किम" या कादंबरीमध्ये ‘जगाच्या आतील एक वेगळे जग’ व ‘जिथे स्वत: देव नांदतो’ असं म्हणत ज्या ठिकाणाचे वर्णन केलं होतं ते ठिकाण म्हणजे स्पिती व्हॅली. तिथे राहणाऱ्या प्रख्यात लोकांचे म्हणणे आहे की किन्नौरचे राज्य मगध, मौर्य, किरता, कंबोजा, पनासिका आणि वल्हिका ह्यांनी आक्रमण करून ताब्यात घेतले होते. 9 व्या आणि 12 व्या शतका दरम्यान अगदी अल्प कालावधीसाठी, तिबेटच्या राज्याचे देखील किन्नौरमध्ये वर्चस्व होते. तेव्हा जसे होते तसेच ते आताही आहे म्हणूनच स्पितीला "परिकथेतील स्वर्ग" असे पण म्हंटले जाते.
हिमाचल प्रदेशचा हा उत्तर- ईशान्य असा पसरलेला भाग. हिमाचल प्रदेश राज्यातील उत्तर पूर्वीय भागात कोल्ड डेझर्ट माऊंटन व्हॅली पसरलेली आहे तीच ही किन्नौर-स्पिती व्हॅली. स्पितीचा अर्थ ‘मध्यवर्ती भूभाग’ असा होतो. पूर्वेकडील भाग हा इंडो-तिबेटला जोडत असल्याने किन्नौर स्पिती मध्ये तिबेटियन संस्कृतीचे साम्य जाणून येते. भारत आणि तिबेट सीमेवर वसलेला हा भाग त्याच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याने प्रत्येकाला भुरळ घालतो. ह्याच भागात झंस्कार, हिमालय आणि धौलधार अश्या तीन सुंदर डोंगररांगा आहेत. या परिसरात हिमालयाची सुंदर आणि रौद्र रूपे एकाच वेळी अनुभवयास मिळतात. म्हणूनच ज्यांना भटकंतीची मुळातच आवड आहे अशा भटक्यांना, बायकर्सना, फोटोग्राफर्सना आणि ऍडव्हेंचरची मनापासून आवड असणाऱ्यांसाठी हा भाग म्हणजे पर्यटनाची पर्वणीच!!

स्पिती व्हॅलीमध्ये येण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मनाली, रोहतांग पास, चंद्रताल, कुंझुमला पास मार्गे काझा, तर दुसरा शिमला, नार्कंडा, चितकुल, कल्पा, नाको मार्गे टाबो, काझा असे पर्याय आहेत. सतलज, बस्पा, स्पिती नद्यांच्या काठावर वसलेली हि सर्व पर्यटनस्थळे आहेत. किन्नौर व्हॅलीचा नजारा अगदी मंत्रमुग्ध करणारा असतो. थेट आकाशाला भिडणारी बर्फच्छादित शिखरे नजरेचं पारणं फेडतात तर दरीखोऱ्यातून वर येणारे ढग हिमालयाला बिलगतात तेव्हा त्यांचा अगदी हेवा वाटतो. व्हॅलीमधील आणखी आश्चर्य म्हणजे तेथील मॉनेस्ट्री (बुद्ध मंदिरे), अल्पाइन चे जंगल, तलावं, दारी-खोरे आणि जगातील सर्वात उंचावरील पोस्ट ऑफिस. हो हो पोस्ट ऑफिसच म्हणतोय मी, स्पिती व्हॅलीमधील हिक्कीम या गावातील पोस्ट ऑफिसला ‘हायेस्ट पोस्ट ऑफिस इन द वर्ल्ड’ चा बहुमान मिळाला आहे. तिथे होणाऱ्या अति बर्फवृष्टी मुळे सहा महिने हे पोस्ट ऑफिस बंद असते. हे पोस्ट ऑफिस साधारण समुद्र सपाटी पासून १४,४०० फूट उंचीवर आहे. तसेच सारहान गावात भीमाकाली देवीचे मंदिर आहे. हे मंदिर लाकूड आणि दगडांवर कोरीव कलाकृतीने बनलेले आहे आणि भीमाकाली (काली मातेचे रूप) हे जगातील ५१ शक्तीपीठ पैकी एक शक्तीपीठ आहे. स्पितीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे किन्नौर कैलासची परिक्रमा (परिभ्रमण) बरेच गिर्यारोहक हे ट्रॅकिंग करण्यासाठी उत्सुक असतात परंतु परिक्रमा मार्ग बऱ्यापैकी अवघड आहे म्हणूनच आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता बघूनच हि परिक्रमा करावी.
निसर्गाशी साधर्म साधत बांधलेल्या वेगवेगळ्या स्तुपांमधून, गोम्पांमधून साचेबद्ध, आखीव-रेखीव सौंदर्यखुणा आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. चिटकुल हे भारत-तिबेट सीमेवरचं बास्पा नदीच्या काठी बसलेलं शेवटचं गाव, म्हणून बरेच पर्यटक ह्या लहानश्या गावाला भेट देण्याला विसरत नाही. एका बाजूला हिरवेगार डोंगर तर दुसऱ्या बाजूला लहान मोठे डोंगर, मधून दूरवर दिसणारी बर्फाच्छादित शिखरं, खळखळून वाहणारी बास्पा नदी असं अदभुतरम्य दृश्य चिटकूल व्हिलेजला जाताना दिसत. तसेच बस्पा आणि स्पिती नदीचा संगम सुद्धा मनमोहक आहे. बस्पा नदीचे पाणी थोडे करड्या रंगाचे तर स्पिती नदीचे पाणी अतिशय निखळ आणि पारदर्शी हा फरक बघायला मिळतो. नाको गावातील नाको लेक, आजूबाजूला असलेली हिरवीगार वनवृष्टी, डोंगर आणि त्याचे प्रतिबिंब नाको लेकमध्ये असा सुंदर देखावा पाहायला मिळतो. कल्पा मधील सुसाईड पॉईंट सुद्धा खूप सुंदर आहे पण तेवढाच भीतीदायक सुद्धा वाटतो. गुई मॉनेस्ट्री, टाबो मॉनेस्ट्री आणि कि मॉनेस्ट्री अश्या बऱ्याच मॉनेस्ट्री आहेत. टाबो मॉनेस्ट्री हि प्राचीन आहे असं सांगितलं जातं. तिथे बुद्धाची सुंदर मूर्ती आणि पेंटीग्स आहेत. कि मॉनेस्ट्री हि त्या भागातली सर्वात मोठी मॉनेस्ट्री आहे तेथील निसर्ग हा खूपच सुंदर आहे. तिथल्या वातावरणातली निरव शांतंता हि मानसिक शांतता देणारी असल्यामुळे एक वेगळाच अनुभव येऊन जातो. काझा हुन कूमझुम ला पास मार्गे चंद्रतालला जाता येतं, चंद्रतालला जाताना रास्ता हा खूप अरुंद आणि कठीण आहे तसेच थन्डी सुद्धा बऱ्यापैकी असल्याने ऑक्सिजन चे प्रमाण थोडे फार कमी जास्त असते. तिथे हॉटेल्स नसल्यामुळे कॅम्पिंग ची सोय असते. चंद्रताल सारख्या अतिशय सुंदर तलावाच्या शेजारी टेन्ट मध्ये राहायचा अनुभव खूपच सुंदर आहे. वरती गडद निळं आकाश, खाली अत्यंत स्वच्छ पाण्याचा निळाशार जलाशय, तिन्ही बाजूंनी वेढणारे वेगवेगळ्या रंगाचे डोंगर, अस अदभुत दृश्य अनुभवायला मिळतं.
हिमालयाचं एक अनोखं सौंदर्य स्पिती खोऱ्यात दडलेलं आहे. त्याची ओळख पर्यटकांना तशी कमीच आहे. एकदा तरी ती ओळख करून घ्यायलाच हवी. स्पिती व्हॅलीची टूर म्हणजे अनोखा अनुभव ठरते आणि स्पितीचे सौंदर्य आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. इथल्या परिसरात राहणाऱ्या लोकांचं जीवन खडतर आहे. तरीही त्यांच्या वागण्यात आदबशीरपणा आहे, वृत्ती समाधानी आहे. आपल्यासारख्या पैशापाठी धावणाऱ्या शहरी माणसांना बरंच काही शिकवून जाणारी आहे. आयुष्यात एकदा तरी लक्झरी आयुष्य सोडून थोडा वेगळा अनुभव घ्यायला हवा. आपल्या धावपळीच्या जीवनातून निसर्गाच्या विविध छटा बघायला काही काळ तरी द्यायलाच हवा.. 😍
सूचना:- ब्लॉग मधील शब्दांकन ट्रॅव्हलर्स स्टुडिओचे आहे.
संदर्भ आणि फोटो - गुगल स्त्रोत
ट्रॅव्हलर्स स्टुडिओ


��
ReplyDeleteNice one
ReplyDeleteThanks
DeleteThank you so much..
ReplyDeleteछान
ReplyDelete